Ad will apear here
Next
मीरा के प्रभू गिरधर नागर!


संत मीराबाई! भारतीय संत-कवी परंपरेतील एक अद्भुत दुवा. भगवान कृष्णाच्या भक्तीत दंग होऊन ज्यांचे जीवन केवळ कृष्णमय झाले, अशा संत मीराबाई यांची आज पुण्यतिथी. 

खरे तर संत मीराबाई यांचा जन्म व मृत्यू यांच्या तारखा व वर्ष या दोन्ही बाबतींत अनेक मतप्रवाह व विवाद आहेत; पण १५५८मध्ये आजच्या दिवशी (दोन मार्च) संत मीराबाई कृष्णाकडे निघून गेल्या असे त्यांचे भक्त मानतात. म्हणून अधिक विवादात न जाता आपण आजचाच दिवस त्यांचा स्मृतिदिन मानून त्यांच्या अगाध कृष्णभक्तीला वंदन करू या!

राजस्थानातील जोधपूर जिल्ह्यात कुरकी नावाच्या गावात मीरेचा जन्म १५०४मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रत्नसिंह. लहान वयातच मीरेचा विवाह उदयपूरमधील चित्तोडचे महाराणा संग सिंह यांचा पुत्र कुँवर भोजराज यांच्या समवेत झाला. दुर्दैवाने लवकरच भोजराजाचे निधन झाले. पाठोपाठ वडील, सासरे आदी आप्तेष्टही मरण पावल्याने मीरा दु:खी, कष्टी झाली. त्यातूनच ती कृष्णभक्ती करू लागली.

मीरेचे कृष्णप्रेम इतके लोकविलक्षण, की ती साक्षात कृष्णालाच आपला जीवनसाथी मानून भजने करू लागली व मंदिरात नाचूही लागली. 

राजघराण्यातील महिलेने असे सार्वजनिक ठिकाणी गाणे, नाचणे तेव्हाच्या रुढी-रिवाजांना धरून नव्हते. मीरेला रोखण्याचा प्रयत्न तिच्या सासरच्या मंडळींनी केला. ती ऐकेना, तेव्हा तिच्यावर दोन वेळा विषप्रयोगही झाले, असे म्हटले जाते; पण मीराबाईंवर विषप्रयोगाचा परिणाम झाला नाही. साक्षात भगवंतांनीच तिचा विषाचा प्याला प्राशन केला, अशा आख्यायिका आहेत.

ते काहीही असो. मीराबाई बचावल्या, हे मात्र खरे. कृष्णभक्तीची भजने रचणे, गाणे व त्यावर नृत्यही करणे, यामुळे त्यांची कीर्ती दिगंत झाली व राजस्थानबरोबरच शेजारच्या गुजरात, पंजाबमधील कृष्णभक्तही तिचे अनुयायी बनले. आता त्या संत मीराबाई बनल्या. 

एका आख्यायिकेनुसार सम्राट अकबराच्या कानावर तिची कीर्ती गेली. त्याला मीराबाईंना भेटायचे होते; पण ते शक्य नव्हते. कारण चित्तोडच्या राजघराण्याशी मुघलांचे वैर होते. म्हणून तानसेनला घेऊन अकबर भिकाऱ्याच्या वेषात मीराबाईना भेटला व त्यांच्या भजनांवर खूश होऊन आपल्या गळ्यातील कंठहार त्याने मीराबाईंच्या पायावर ठेवला. अर्थात या कथेला ऐतिहासिक आधार नाही.

राजवाड्यात राहणे अशक्य आहे, हे ध्यानात आल्यावर त्या बाहेर पडल्या व हातात तंबोरा घेऊन कृष्णाच्या लीला गात गात त्या वृंदावनला येऊन पोहोचल्या व तिथे त्यांनी आराधना पुढे चालू केली. काही वर्षांनी त्या चालत चालत द्वारकेला येऊन पोहोचल्या व तिथेच त्यांनी इहलोकीची यात्रा संपवली.

मीराबाईंच्या जीवनकालाप्रमाणेच त्यांच्या आयुष्याबद्दलही इतिहासापेक्षा आख्यायिकाच अधिक आहेत व त्या परस्पर भिन्नही आहेत. इतके मात्र खरे, की भक्ती संप्रदायातील त्यांची कामगिरी अद्वितीय आहे. 

त्यांच्या रचनांमध्ये राजस्थानीबरोबरच हिंदी, भोजपुरी व गुजराती शब्द आढळतात. पुढील पाच शतके संत मीराबाईंची भजने लोकप्रियच राहिली व त्यांच्या जीवनावर अनेक चित्रपट, नाटके येऊनही त्यांच्या जीवनाबद्दलची उत्सुकताही कायम राहिली, यातच त्यांचे मोठेपण दिसून येते.

आपल्या रचनांच्या अखेरीस त्या ‘मीरा के प्रभू गिरिधर नागर’ असे म्हणत. त्यांनी कृष्णालाच आपले ‘प्रभू’ मानले होते व आपले सर्वस्व त्याच्या चरणीच अर्पण केले होते, हेच यातून सिद्ध होत राहते. संत कबीर, तुलसीदास अशा उत्तर हिंदुस्थानी संत-कवी परंपरेत त्यांचे स्थान मानाचे आहे.

त्यांच्या एका लोकप्रिय रचनेत त्यांनी आपल्या जीवनाचे जणू गमकच उलगडले आहे. त्या म्हणतात -

पायो जी म्हे तो 
राम रतन धन पायो।।
वस्तु अमोलक दी मेरे 
सतगुरु किरपा कर अपनायो।।
जनम जनम की पूंजी पाई 
जग में सभी खोवायो।।
खायो न खरच चोर न लेवे 
दिन-दिन बढ़त सवायो।।
सत की नाव खेवटिया सतगुरु भवसागर तर आयो।।
मीरा के प्रभू गिरधर नागर 
हरस हरस जश गायो।।

- भारतकुमार राऊत

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AUKFCW
Similar Posts
साम्यवादाचा जनक १९व्या व २०व्या शतकात ज्याच्या क्रांतिकारी विचारांनी अवघ्या जगाला भुरळ घातली व निम्म्या जगातील राज्यव्यवस्था पार बदलून गेली, असा साम्यवादी विचारसरणीचा उद्गाता कार्ल मार्क्स याचा आज (१३ मार्च) स्मृतिदिन!
सुंदर व सत्शील दुर्गाबाई! मराठी बोलपटाचा पहिला स्त्री चेहरा दुर्गा खोटे यांचा आज (१४ जानेवारी) जन्मदिन. त्यांच्या रूपेरी स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली! ‘अयोध्येचा राजा’ या मराठी चित्रपटाबरोबर चित्रपट ‘बोलू’ लागला. या मराठीतील पहिल्या बोलपटात त्यांनी प्रमुख अभिनेत्रीची भूमिका केली होती. १९०५ साली जन्मलेल्या दुर्गाबाईंनी
निळा म्हणे...! महाराष्ट्राच्या संतपरंपरेने श्री ज्ञानेश्वरांपासून तुकडोजी व गाडगेबाबांपर्यंत अनेक अनमोल मणी जोडले; पण त्यातले काही विस्मृतीत गेले. संत निळोबाराय त्यापैकीच एक. त्यांची आज (चार मार्च) पुण्यतिथी.
‘ल्युटिन्स’चा कर्ता ज्याला नवी दिल्ली शहराची थोडी फार माहिती व शहराच्या इतिहासाची जाण आहे, त्यांना ‘ल्युटिन्स’ परिसराची माहिती असतेच. प्रशस्त रस्ते, दुतर्फा शोभिवंत फुलझाडे, शोभिवंत चौक आणि परिसरात सुंदर टुमदार बंगले व प्रशस्त प्रशासकीय इमारती हे सारे वैभव ही भारताच्या राजधानीची शान आहे. हा भाग ज्यांनी वसवला ते कल्पक वास्तुकार एडविन ल्युटिन्स

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language